‘निपुण भारत अभियान’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन;
बाल हक्क कृती समितीचा पुढाकार
भारत सरकारने वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या अभियनाला ‘निपुण भारत’ असे नाव देण्यात आले आहे. ‘निपुण भारत’ या अभियानाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘बालहक्क कृती समिती’च्या पुढाकारातून २१ मार्च २०२३ रोजी निवारा सभागृह, नवी पेठ, पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर क्षिरसागर, स्वाधार संस्थेच्या संचालिका अंजली बापट, डोअर स्टेप स्कूलच्या संचालक शुभांगी पुरंदरे, तसेच पुणे शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी’ अर्थात ‘निपुण’ या अभियानाच्या अंतर्गत राज्य शासनाने निपुण मित्र – क्षमता बांधणी, निपुण भारत गुणवता वृध्दी, माता पालक गट, शाळा सुधार कार्यक्रम, मुख्याध्यापक सक्षमीकरण, जिल्हा गुणवत्ता कक्ष, विनोबा ऍप, अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, जिल्हास्तरीय सुकाणू समितीद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संनियंत्रण केले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या २७ ऑक्टोबर २०२१ व २६ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयांद्वारे ‘निपुण भारत’ तसेच ‘पायाभूत साक्षरता व अंकज्ञान’ (एफएलएन मिशन) या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या संस्थांच्या माध्यमातून, ‘निपुण भारत’ अभियनाच्या उद्दीष्टांनुसार पुणे शहर व परीसरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जावी व त्यानुसार पुढील कृती आराखडा तयार करावा, असे उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या चर्चेतून ठरविण्यात आले. तसेच, जिल्हास्तरीय सुकाणू समितीमध्ये राज्यस्तरीय समितीच्या धर्तीवर एक अशासकीय संस्था प्रतिनिधी नेमण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे ठरविण्यात आले. शासकीय यंत्रणेला ‘निपुण भारत’ अभियानाचे उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य म्हणून, पुणे जिल्ह्यातील ज्या शाळांना अंमलबजावणीमध्ये मदतीची गरज असेल अशा ठिकाणी स्वय़ंसेवी संस्था पुढे येतील, असे यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले.