Tuesday 21 November 2023

बालहक्क आणि पर्यावरण, हवामान बदल (जनरल कमेंट २६)



स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत वातावरण आमचा हक्क : महाराष्ट्रातील मुलांची मागणी 

पुणे : पर्यावरणीय ऱ्हासामुळे जागतिक पातळीवर बालकांचे हक्क धोक्यात येतात, त्यामुळे मुलांना स्वच्छ, निरोगी  आणि शाश्वत वातावरण मिळण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंगळवार, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी, पत्रकार भवन पुणे येथील राज्यस्तरीय परिषदेमध्ये करण्यात आली. बालहक्क आणि पर्यावरण विषयावरील या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या मुलांनी व युवकांनी आपली मते मांडली.
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेमध्ये, मुलांचे हक्क पर्यावरण आणि हवामान बदलांशी कसे संबधित आहेत आणि या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क समितीने एक डॉक्युमेंट तयार केले असून, याला “जनरल कमेंट २६” म्हटले गेले आहे. या “जनरल कमेंट २६” बद्दल जनजागृती व शासकीय/गैरशासकीय पातळीवरील अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्याच्या उद्देशाने, पुण्यातील बालहक्क कृती समिती, न्यू व्हिजन संस्था, तेरे देस होम्स जर्मनी, आणि बाल मजुरी विरोधी अभियान या संस्थांमार्फत या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरणीय बदलामुळे शेती व शेतीशी निगडीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण  विकासावर परिणाम होतो. शहरी भागात देखील पर्यावरणीय बदलामुळे अनेक कुटुंबे प्रभावित झाली असून, स्वच्छ आणि निरोगी वातावरणापासून मुले वंचित राहतात. शहरातील वायू आणि जल प्रदूषण समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या मुलांनी केली. पर्यावरणीय बदलाचा आपल्या आयुष्यमानावर कसा प्रभाव पडला आहे व त्यावर शासनाने काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मुलांनी आपली मते मांडली. पुणे, औरंगाबाद, परभणी, बीड, अहमदनगर, सोलापूर, या जिल्ह्यांमधील मुले, युवक, तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला.

पुणे जिल्हा बाल कल्याण समिती १ व २ च्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर व नंदिता अंबिके, भारत सरकारच्या पर्यावरण शिक्षण केंद्राचे अवधूत अभ्यंकर, जीविधा संस्थेचे राजीव पंडित, तेरे देस होम्स जर्मनी संस्थेचे संपत मांडवे, आरोग्य हक्क परिषदेचे दिपक जाधव विचारमंचावर उपस्थित होते. पर्यावरणाचा ऱ्हास व हवामान बदल याचा परिणाम म्हणून स्थलांतर व त्यासंबंधाने बालहक्कांचे होणारे उल्लंघन, याबाबत मान्यवरांनी आपले विचार मांडले. स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण या संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांवर काम करताना बाल कल्याण समितीला येणारे अनुभव, आव्हाने याबद्दल समितीच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन केले. मुलांनी मांडलेल्या समस्यांवर समितीकडून पाठपुरावा करता येईल, त्यासाठी विविध शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून काम करता येईल, अशी चर्चा झाली. बाल विवाह, बाल मजुरी, कुपोषण, स्थलांतर, शाळाबाह्य मुले, या सर्व समस्या पर्यावरणातील बदलाशी जोडलेल्या आहेत. यामधील परस्परसंबंध समजून घेऊन पर्यावरणाच्या मुद्याला आपल्या कामाचा भाग बनवण्याची गरज असल्याचे मत तेरे देस होम्स संस्थेच्या संपत मांडवे यांनी मांडले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क समितीने तयार केलेल्या जनरल कमेंट २६ मार्गदर्शिकेनुसार केंद्र व राज्य सरकारने संबंधित कायद्यात योग्य बदल करावेत व पर्यावरण रक्षण आणि बालहक्क संरक्षणाकडे अधिक लक्ष पुरवावे, यासाठी पुढील काळामध्ये पाठपुरावा करण्यात येईल, असे परिषदेच्या शेवटी ठरले.


संपर्क: arcpune09@gmail.com
बालहक्क कृती समिती, पुणे

No comments:

Post a Comment

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...