पानशेत क्लस्टर स्कूल व्हिजिट
बालहक्क कृती समिती, पुणे यांच्या वतीने मंदार शिंदे, सुशांत आशा, मनीष श्रॉफ, दत्ता वेताळ, पंकज, प्रमोद पाटील, अतुल भालेराव, यामिनी आद्बे, पौर्णिमा गादिया, असे नऊ 'आर्क' मेम्बर आज १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या 'पानशेत क्लस्टर स्कूल' आणि परिसरातील गावांमध्ये जाऊन आलो.
१. जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या मदतीने पानशेत क्लस्टर स्कूलची एक मजली इमारत बांधून तयार आहे. एकूण बारा खोल्या बांधल्या आहेत. अजून स्वच्छतागृह आणि काही बांधकाम करणे बाकी आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या बातमीनुसार, दहा किलोमीटर परिसरातील कमी पटसंख्येच्या सोळा शाळा बंद केल्या जातील आणि पहिली ते आठवीचे १५० ते २५० विद्यार्थी या क्लस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतील.
२. पानशेत क्लस्टर स्कूल इमारतीपासून चालत जाण्याच्या अंतरावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पाचवी ते दहावी (अनुदानित) हायस्कूल आहे. इथे सध्या १५० विद्यार्थी शिकतात. आमच्या गावात शाळा नसल्यामुळे दररोज दहा ते बारा किलोमीटर चालून या शाळेत यावे लागते, असे इथल्या मुलांनी व मुलींनी सांगितले. साधारण दोन-अडीच तास येण्यासाठी आणि तेवढाच वेळ परत जाण्यासाठी लागतो. दहावीनंतर शिकण्यासाठी खानापूर किंवा पुण्यात जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे दहावी झालेली बहुतांश मुले-मुली घरीच आहेत, असे शिक्षक व मुलांनी सांगितले. पानशेतमध्ये पाचवी ते दहावी हायस्कूल असताना पुन्हा पहिली ते आठवी नवीन शाळा का बांधली, हे शिक्षक आणि गावकऱ्यांसाठी आश्चर्याचे आहे. त्यापेक्षा वसतीगृह बांधले असते तर अजून जास्त शाळाबाह्य मुले शिकू शकली असती, असे शिक्षकांचे मत आहे.
३. पानशेत शेजारील कुरण गावामध्ये ग्रामसेवक आणि गिवशी-आंबेगावचे सरपंच यांना भेटलो. कमी पटसंख्येची शाळा बंद करण्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी परस्पर निर्णय घेतला असून, गावकरी किंवा ग्रामपंचायतीला विचारले नाही, असे सरपंचांनी सांगितले. गावातली शाळा बंद झाल्यास मुलांचे शिक्षण थांबेल, असे त्यांना वाटते. शालेय वाहतुकीच्या सोयीबद्दल त्यांना खात्री वाटत नाही. मधल्या काळात स्थानिक गावकरी रोजगारासाठी शहरात स्थलांतरित झाले, पण आता गावात हॉटेल, रिसॉर्ट वाढत असल्याने रोजगार उपलब्ध होत आहेत; आता मुलांची संख्यासुद्धा वाढेल, असे त्यांना वाटते. इतर गावांमधील सरपंचांसोबत चर्चा करून शाळाबंदीच्या विरोधात ठराव करण्याची त्यांची तयारी आहे.
४. कुरणच्या पुढे कादवे गावामध्ये पहिली ते चौथी एकूण ८० पटसंख्या आहे. शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव देऊन नवीन वर्गखोल्या बांधण्याचे काम सुरु केले आहे. वरघड, आंबेगाव, गिवशी अशा गावांपासून कादवे गाव पानशेतपेक्षा खूप जवळ आहे. हे गाव ओलांडून पानशेतला क्लस्टर स्कूलपर्यंत मुलांना न्यायची कल्पना कादवेच्या गावकऱ्यांना आश्चर्यकारक वाटली.
५. कादवेपासून आतमध्ये वरघड गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेची पटसंख्या कमी असली तरी इथून पानशेतला जाणे खूप अवघड आहे. गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून तेवढेच शिकलो; सातवीपर्यंत शाळा असती तर अजून शिकलो असतो, असे स्थानिक रहिवाशाने सांगितले. आता ही शाळासुद्धा बंद झाली तर आमची मुले शिकूच शकणार नाहीत, असे त्यांना वाटते.
६. वरघडच्या पुढे आंबेगावमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे, जिथे चौथीची एकच मुलगी शिकते. गावामध्ये या वयोगटातील आणखी मुले नाहीत. पुढच्या वर्षी पहिलीमध्ये दोन मुले येतील, पण ही शाळा बंद झाल्यास इतक्या लहान मुलांना पानशेतला पाठवणे शक्य नाही, असे त्यांच्या पालकांनी सांगितले. सध्या या शाळेतील शिक्षक सदर मुलीला त्यांच्या गाडीतून दररोज दुसऱ्या गावातील शाळेत घेऊन जातात. दुसऱ्या शाळेतदेखील एकच मुलगी शिकते, तिथे या दोन मुलींना एकत्र शिकवले जाते.
७. आंबेगावच्या पुढे गिवशी गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. इथे सध्या एकच विद्यार्थी आहे, परंतु गावामध्ये नवीन घरे बांधली जात आहेत. परिसरातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये कामासाठी स्थानिक किंवा बाहेरील कुटुंबे येत आहेत. मुलांची संख्या वाढेल, असे पोलिस पाटील यांनी सांगितले. गावकऱ्यांशी चर्चा न करता, परस्पर शाळाबंदीचा निर्णय घेऊन खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे, असे पोलिस पाटील म्हणाले. आम्ही ही शाळा बंद होऊ देणार नाही; पूर्वी ज्या गावकऱ्यांनी शाळेसाठी जमीन दिली, त्यांना या जागेवर आता रिसॉर्ट करायचे आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
वरील सर्व शाळा आज बंद होत्या, कारण सर्व शिक्षक 'प्राथमिक शिक्षक महासंघा'च्या अधिवेशनासाठी रत्नागिरीला गेले आहेत. त्यामुळे शिक्षकांशी बोलता आले नाही. पालक, गावकरी, सरपंच, ग्रामसेवक, या सगळ्यांचा मात्र गावातील शाळा बंद करण्याला आणि क्लस्टर स्कूलमध्ये मुलांना पाठवण्याला विरोध दिसला.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना भेटून पुढील चर्चा व प्रक्रियेचे नियोजन करत आहोत. यासंदर्भात काही सूचना किंवा माहिती असल्यास नक्की कळवा.
धन्यवाद!
मंदार शिंदे
बालहक्क कृती समिती, पुणे