बालहक्क सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
१४ नोव्हेंबर राष्ट्रीय बालदिन व २० नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बालहक्क दिवस या निमित्ताने पुणे शहरामध्ये बालहक्क कृती समितीतर्फे बालहक्क सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालहक्कांचे संरक्षण व प्रसार यासाठी गेल्या तीस वर्षांपासून समिती कार्यरत आहे. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मित्रमंडळ चौक पुणे येथील मैत्री सभागृहामध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्राने या सप्ताहाचे उद्घाटन झाले. पुण्यातील विविध वस्त्यांमधील मुलांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य हक्क कार्यकर्ते, पत्रकार, संशोधन व विश्लेषण तज्ज्ञ, इत्यादींनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. बालकांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य, तसेच सहभागाच्या संधी, या विषयांवर चर्चा झाली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्डलाइन यासारख्या महत्त्वाच्या यंत्रणा पुण्यामध्ये कार्यरत नाहीत, तसेच वॉर्डस्तरीय बाल संरक्षण समित्यांची स्थापना झालेली नाही, याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. बालकांसाठी, विशेषतः स्थलांतरित व वंचित कुटुंबांसाठी किमान नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शासकीय विभागांकडे पाठपुरावा करावा, बालहक्कांशी संबंधित कायदेशीर तरतुदी व शासकीय विभागांची कार्यपद्धती याबाबत संस्था प्रतिनिधींचे प्रशिक्षण आयोजित करावे, आणि माध्यमांकडे व लोकप्रतिनिधींकडे बालहक्कांशी संबंधित प्रश्नांची माहिती नियमितपणे पोहोचावी या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे या चर्चासत्राच्या शेवटी ठरवण्यात आले.
बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दि. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन, पुणे येथे विविध कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. पुण्याच्या विविध भागातील वस्ती पातळीवरील व शाळांमधील मुला-मुलींनी काढलेली चित्रे या ठिकाणी उपलब्ध असतील. तसेच, या कालावधीमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वस्तीपातळीवरील मुलांसाठी बालनाट्य प्रयोगाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुला-मुलींना विविध नाट्यप्रकार व त्यांचा आपले मत व मुद्दे मांडण्यासाठी कसा वापर करावा याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
बालमजुरी व बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन, अत्याचार व शोषणापासून बालकांचे संरक्षण, आणि सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, अशी उद्दीष्टे घेऊन बालहक्क कृती समिती काम करत आहे. समितीच्या कामात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क -
सुशांत आशा, समन्वयक, बालहक्क कृती समिती, पुणे
9011029110
arcpune09@gmail.com