Wednesday, 7 February 2024

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी



रस्त्यावरील परिस्थितीमधील बालकांच्या समस्या इतर मुलांपेक्षा वेगळ्या असल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांचा विचार करण्याची व स्वयंसेवी संस्थांसोबत समन्वयाची गरज आहे, असे मत पुणे जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर व नंदिता अंबिके यांनी व्यक्त केले. ‘रस्त्यावरील परिस्थितीमधील बालकांच्या समस्या व पुनर्वसन’ या विषयावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे, सर्व सेवा संघ पुणे, आणि बालहक्क कृती समिती पुणे यांच्यातर्फे एक-दिवसीय चर्चासत्राचे आयोजन दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी, वाय.एम.सी.ए. रास्ता पेठ, पुणे या ठिकाणी करण्यात आले. रस्त्यावर राहणारी मुले, रस्त्यावर काम करणारी मुले, आणि रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबातील मुले अशा तीन प्रकारची १०,४२७ मुले २०१६ साली पुणे महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली होती. या मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनातर्फे कृती कार्यक्रम आखण्यात आला होता; परंतु अजूनही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अनेक मुले रस्त्यावर दिसत असून, कोविडनंतर यामध्ये वाढ झालेली असण्याची शक्यता आहे. या मुलांच्या पुनर्वसनासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) तयार केली असून, यंत्रणेतील प्रत्येक घटकाची भूमिका व जबाबदारी त्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच, रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांसाठी ‘पथदर्शी फिरते पथक’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आला आहे. सदर चर्चासत्रामध्ये बालहक्क कृती समितीचे मंदार शिंदे व बाल कल्याण समिती मार्गदर्शक सुमित्रा अष्टीकर यांनी कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन केले. तसेच, होप फॉर द चिल्ड्रन संस्थेकडून फिरत्या पथकाच्या कामगिरीचा व आव्हानांचा आढावा घेण्यात आला. सर्व सेवा संघाच्या सुनिता मिन्ज यांनी स्वयंसेवी संस्थांना व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी व अनुभव यांची मांडणी केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पुणे जिल्हा बाल कल्याण समिती (१ व २) अध्यक्ष व सदस्य यांनी सहभाग घेतला. तसेच, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास विभाग यांचे प्रतिनिधी, पुणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत भरोसा सेलतर्फे मा. अर्चना कटके मॅडम व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत विशेष बाल पोलिस पथकाचे मुठे सर उपस्थित होते. रस्त्यावरील व वस्तीमधील मुलांना औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांचे समुपदेशन करणे व त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक असल्याचे विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी नमूद केले. चर्चासत्राच्या शेवटी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसाठी एक कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार, रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांची व त्यांच्या कुटुंबांची किमान सरकारी कागदपत्रे तयार करण्यासाठी व मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बाल कल्याण समितीमार्फत प्रयत्न करावेत, संस्थात्मक पुनर्वसनातील अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने मान्यताप्राप्त बालगृहांच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांसोबत संवाद व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावा, राष्ट्रीय स्तरावरील ‘बाल स्वराज पोर्टल’मध्ये अशा बालकांची नोंद करावी, तसेच स्थानिक प्रशासनासोबत पाठपुरावा करून शहरातील रस्त्यावरील मुलांबाबत अधिकृत धोरण तयार करावे, असे ठरवण्यात आले. चर्चासत्राचे आयोजक सर्व सेवा संघ पुणे व बालहक्क कृती समिती पुणे याबाबत पुढील पाठपुरावा करतील.

अधिक माहितीसाठी संपर्क:
सर्व सेवा संघ 9869666840 sarvaseva@gmail.com
बालहक्क कृती समिती 9822401246 arcpune09@gmail.com
 


Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...