पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ साठी मुलांच्या मागण्यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन
पुणे : जागतिक बालहक्क दिनाचे (२० नोव्हेंबर) औचित्य साधून पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या बालकांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अपेक्षित असणाऱ्या मागण्यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. शनिवारी पत्रकार भवन येथे 'बालहक्क कृती समिती'च्या बालकांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
बालहक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध देशांनी एकत्र येऊन 'युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ दी चाईल्ड' अर्थात UNCRC हा महत्वपूर्ण करार २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी मान्य केला. मूल कुणाला म्हणावे, त्यांना नेमके कोणते हक्क असतात, आणि सहभागी देशांमधील संबंधित सरकारांनी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याबाबत स्पष्टीकरण UNCRC मध्ये देण्यात आलेले आहे. हे सर्व हक्क एकमेकांशी संबंधित असून, यापैकी प्रत्येक हक्काचे समान महत्व आहे आणि मुलांना या हक्कांपासून कुणीही वंचित ठेऊ शकत नाही, अशी या कराराची संकल्पना आहे. या कराराच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून पाळला जातो.
UNCRC च्या भारतातील अंमलबजावणीसाठी शासनाकडे स्थानिक पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी 'बालहक्क कृती समिती' (Action for the Rights of the Child - ARC) हे बालहक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचे व्यासपीठ ३० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले. तेव्हापासून पुण्यातील बालकांच्या शिक्षण, संरक्षण, सहभाग, तसेच बालमजुरी व बालविवाह अशा सर्व प्रश्नांवर 'बालहक्क कृती समिती' काम करीत आहे.
बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून बालकांच्या जाहिरनाम्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या जाहीरनाम्यामध्ये मुलांच्या शिक्षण, आरोग्य, मनोरंजन तसेच संरक्षणासंदर्भातील २२ मागण्यांचा समावेश आहे. जाहिरनामा निर्मिती प्रक्रियेमध्ये पुणे शहरातील १०० मुलांनी सहभाग घेतला आहे.
मुलांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन, चर्चा करून आपल्या मागण्यांची यादी तयार केली आहे. सदर मागण्या नियोजित निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बालहक्क कृती समिती’ प्रयत्न करणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा. धन्यवाद!
आपले नम्र,
बालहक्क कृती समिती (आर्क), पुणे.
९०११०२९११० / ९८२२४०१२४६
No comments:
Post a Comment