Monday, 22 August 2022

ARC Youth Gathering 2022

बालहक्क कृती समितीमधील युवकांच्या पुढाकारातून आयोजित “युवा संमेलन २०२२” उत्साहात पार पडले. जागतिक युवा दिनानिमित्त रविवारी २१ ऑगस्ट रोजी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज, ज्ञानेश्वर सभागृह येथे युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड येथील विविध वस्त्यांमध्ये राहणारे शंभरहून अधिक युवक व युवती सहभागी झाले होते. बदलते हवामान आणि त्याचे परिणाम याबद्दल युवकांची भूमिका, व्यावसायिक शिक्षणाचे पर्याय, तसेच सध्याच्या काळातील शिक्षण व रोजगाराच्या संधी आणि आव्हाने अशा विविध विषयांवर संमेलनामध्ये चर्चासत्रे झाली. 




पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या पर्यावरण शिक्षण केंद्र (सीईई) या संस्थेचे अवधूत अभ्यंकर यांनी हवामान बदल, वाढते तापमान, समुद्राची वाढती पातळी या समस्यांबाबत युवकांना मार्गदर्शन केले. याला अनुसरुन युवकांनी आपल्या वस्तीपातळीवर सर्वेक्षण व अभ्यास करून वेगळे उपाय शोधण्याची, तसेच याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी घेतली आहे.




प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंडियाचे धर्मेंद्र पाटील यांनी युवकांना आजच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दहावी / बारावी किंवा पदवीनंतर करियरच्या दृष्टीने कोणकोणत्या संधी आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. बालहक्क कृती समितीच्या सदस्य संस्थांचे माजी लाभार्थी व सध्या बांधकाम, नर्सिंग, बँकींग अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवक आणि युवतींनी आपल्या संघर्षाबद्दल व कामाबद्दलचे अनुभव व्यक्त केले. आजच्या युवकांची सत्य परिस्थिती आणि आदर्श युवा वर्तन या विषयावर युवकांनी स्वतः बसवलेले पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.


मुलांनी / युवकांनी त्यांच्यापुढील प्रश्न समजावून घेऊन, स्वतः उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा या उद्देशातुन बालहक्क कृती समिती (आर्क) ने ‘आर्क युथ ग्रुप’चा उपक्रम हाती घेतला आहे. बालहक्क, पर्यावरण, रोजगार, नागरी समस्या अशा विविध विषयांवर ‘आर्क युथ ग्रुप’द्वारे प्रशिक्षण, जनजागृती व कृती कार्यक्रम राबवले जात आहेत.


No comments:

Post a Comment

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...