दि. १९/०६/२०२३
प्रति,
मा. कामगार उपायुक्त,
पुणे
विषय - बाल कामगार संबंधी तक्रारदाराच्या गोपनीयतेचा भंग केल्याबाबत.
महोदय,
सिंहगड रोड परीसरात बाल कामगार आढळल्याबाबत 'पेन्सिल' पोर्टलवर तक्रार प्राप्त झालेली होती. त्यानुसार दि. १५/०६/२०२३ रोजी धाडसत्राचे आयोजन करण्यात आले. दि. १९/०६/२०२३ रोजी सदर धाडसत्राच्या सुविधाकार दुकाने निरीक्षक यांनी 'पेन्सिल' पोर्टलवरील तक्रारदारास थेट फोन करून, पोलिस स्टेशनला सही करायला यायला लागेल, असे सांगितल्याचे आम्हाला समजले आहे.
बाल कामगार समस्येच्या निर्मूलनासाठी जागरूक नागरिकांनी जास्तीत जास्त तक्रारी नोंदवाव्यात, या दृष्टीने ‘पेन्सिल' पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, कामगार विभाग अथवा पोलिसांतर्फे तक्रारदारास फोन करून पोलिस स्टेशनला बोलावले जात असेल तर कुणीही जागरूक नागरिक तक्रार नोंदवण्यास तयार होणार नाही, असे आम्हाला वाटते.
तरी, दुकाने निरीक्षक यांनी कोणत्या अधिकाराखाली तक्रारदारास पोलिस स्टेशनला बोलावले, याबद्दल लेखी स्पष्टीकरण मिळावे, अशी आम्ही बालहक्क कृती समिती, पुणे - जिल्हा बालकामगार कृती दल सदस्य - या नात्याने मागणी करीत आहोत. तसेच, भविष्यात 'पेन्सिल' पोर्टलवर तक्रार नोंदवणाऱ्या नागरिकांची माहिती गोपनीय ठेवली जाईल व त्यांना पोलिस स्टेशनला बोलावले जाणार नाही, याबाबत मा. कामगार उपायुक्त, पुणे यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करीत आहोत.
आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
आपले विश्वासू,
बालहक्क कृती समिती, पुणे
No comments:
Post a Comment