दि. ०२/०७/२०२३
प्रति,
मा. जिल्हादंडाधिकारी तथा
मा. अध्यक्ष, पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदल.
विषयः पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्या जुलै २०२३ मासिक बैठकीबाबत..
आदरणीय महोदय,
आम्ही बालहक्क कृती समिती, पुणे यांच्या वतीने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, शासन निर्णय क्रमांक: सीएलए-२००९/(४)/काम-४, दि. २ मार्च २००९ मधील कलम ३ नुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्या मासिक बैठका मार्च २०२३ महिन्यापासून अनियमित झाल्या असून, कृतीदलाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेल्या विविध विभागांचे प्रतिनिधी सदर बैठकीस सातत्याने अनुपस्थित रहात आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यामध्ये बाल कामगार व त्यासंबंधी समस्या वाढत असून, कृतीदलाच्या मासिक बैठकीमध्ये यावर चर्चा होऊन उपाययोजना ठरविणे तातडीचे व महत्त्वाचे बनले आहे. जुलै २०२३ महिन्याच्या बैठकीमध्ये पुढील मुद्यांवर चर्चा करावी, असे आम्ही कृतीदल सदस्य या नात्याने सुचवीत आहोत -
- जून २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या धाडसत्रांबाबत, तसेच मुक्तता करण्यात आलेल्या बाल व किशोर कामगार बालकांच्या पुनर्वसनाबाबत.
- बाल कामगार संबंधी तक्रार नोंदवणाऱ्या तक्रारदारांच्या गोपनीयतेचा कामगार विभागाकडून भंग होत असल्याबाबत.
- कृती दल सदस्य (शिक्षण, महिला व बाल विकास, पोलिस, इत्यादी विभाग प्रतिनिधी) यांचा सातत्यपूर्ण सक्रीय सहभाग मिळवणेबाबत.
- बाल कामगार शोध व तक्रार नोंदणी याबाबत सर्वसामान्य जनता व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण व जनजागृती यासाठी नियोजनाबाबत.
सदर मुद्यांचा समावेश जुलै २०२३ मासिक बैठकीच्या नियोजनात करावा, तसेच संबंधित कृती दल सदस्यांना किमान पाच दिवस आधी बैठकीचे निमंत्रण पोहोचवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वांना बैठकीस उपस्थित रहाणे शक्य होईल, अशी आम्ही विनंती करीत आहोत.
आपले नम्र,
बालहक्क कृती समिती, पुणे
प्रत –
१. मा. निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.
२. मा. सहाय्यक कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदल.
No comments:
Post a Comment