Thursday, 23 March 2023

NIPUN Bharat Consultation in Pune

‘निपुण भारत अभियान’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन;
बाल हक्क कृती समितीचा पुढाकार
  
भारत सरकारने वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या अभियनाला ‘निपुण भारत’ असे नाव देण्यात आले आहे. ‘निपुण भारत’ या अभियानाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘बालहक्क कृती समिती’च्या पुढाकारातून २१ मार्च २०२३ रोजी निवारा सभागृह, नवी पेठ, पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर क्षिरसागर, स्वाधार संस्थेच्या संचालिका अंजली बापट, डोअर स्टेप स्कूलच्या संचालक शुभांगी पुरंदरे, तसेच पुणे शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी’ अर्थात ‘निपुण’ या अभियानाच्या अंतर्गत राज्य शासनाने निपुण मित्र – क्षमता बांधणी, निपुण भारत गुणवता वृध्दी, माता पालक गट, शाळा सुधार कार्यक्रम, मुख्याध्यापक सक्षमीकरण, जिल्हा गुणवत्ता कक्ष, विनोबा ऍप, अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, जिल्हास्तरीय सुकाणू समितीद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संनियंत्रण केले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या २७ ऑक्टोबर २०२१ व २६ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयांद्वारे ‘निपुण भारत’ तसेच ‘पायाभूत साक्षरता व अंकज्ञान’ (एफएलएन मिशन) या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या संस्थांच्या माध्यमातून, ‘निपुण भारत’ अभियनाच्या उद्दीष्टांनुसार पुणे शहर व परीसरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जावी व त्यानुसार पुढील कृती आराखडा तयार करावा, असे उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या चर्चेतून ठरविण्यात आले. तसेच, जिल्हास्तरीय सुकाणू समितीमध्ये राज्यस्तरीय समितीच्या धर्तीवर एक अशासकीय संस्था प्रतिनिधी नेमण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे ठरविण्यात आले. शासकीय यंत्रणेला ‘निपुण भारत’ अभियानाचे उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य म्हणून, पुणे जिल्ह्यातील ज्या शाळांना अंमलबजावणीमध्ये मदतीची गरज असेल अशा ठिकाणी स्वय़ंसेवी संस्था पुढे येतील, असे यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले.



Friday, 17 March 2023

ARC NIPUN Bharat Consultation in Pune



‘निपुण भारत’ अंतर्गत महाराष्ट्रातील, तसेच पुण्यातील अंमलबजावणी व कार्यपद्धती समजून घेण्याच्या उद्देशाने, दि. २१ मार्च रोजी आर्क च्या वतीने, स्वाधार IDWC, डोअर स्टेप स्कूल, आणि सर्व सेवा संघ या संस्थांच्या पुढाकारातून चर्चासत्राचे आयोजन करीत आहोत.

पुण्याच्या विविध भागांमध्ये वस्तीपातळीवर मुलांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे असे आर्क तर्फे आवाहन करत आहोत.

शासकीय स्तरावरील अंमलबजावणीची सद्यस्थिती व सहयोगी तत्त्वावर माहितीचे आदान-प्रदान, तसेच शाळा स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभाग या मुद्द्यांवर सदर चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

तरी, सदर चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे.

बालहक्क कृती समिती ( आर्क ) आयोजित चर्चासत्र :

निपुण भारत अभियान
(पायाभूत साक्षरता व अंकज्ञान)
अंमलबजावणी व संस्थांचा सहभाग

मंगळवार, दि. २१ मार्च २०२३
सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत
निवारा सभागृह, नवी पेठ, पुणे

संपर्क : 7066 138 138 / 9011029110 

Wednesday, 15 February 2023

Visit to Panshet Cluster School and Villages

पानशेत क्लस्टर स्कूल व्हिजिट

बालहक्क कृती समिती, पुणे यांच्या वतीने मंदार शिंदे, सुशांत आशा, मनीष श्रॉफ, दत्ता वेताळ, पंकज, प्रमोद पाटील, अतुल भालेराव, यामिनी आद्बे, पौर्णिमा गादिया, असे नऊ 'आर्क' मेम्बर आज १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या 'पानशेत क्लस्टर स्कूल' आणि परिसरातील गावांमध्ये जाऊन आलो.

१. जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या मदतीने पानशेत क्लस्टर स्कूलची एक मजली इमारत बांधून तयार आहे. एकूण बारा खोल्या बांधल्या आहेत. अजून स्वच्छतागृह आणि काही बांधकाम करणे बाकी आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या बातमीनुसार, दहा किलोमीटर परिसरातील कमी पटसंख्येच्या सोळा शाळा बंद केल्या जातील आणि पहिली ते आठवीचे १५० ते २५० विद्यार्थी या क्लस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतील. 







२. पानशेत क्लस्टर स्कूल इमारतीपासून चालत जाण्याच्या अंतरावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पाचवी ते दहावी (अनुदानित) हायस्कूल आहे. इथे सध्या १५० विद्यार्थी शिकतात. आमच्या गावात शाळा नसल्यामुळे दररोज दहा ते बारा किलोमीटर चालून या शाळेत यावे लागते, असे इथल्या मुलांनी व मुलींनी सांगितले. साधारण दोन-अडीच तास येण्यासाठी आणि तेवढाच वेळ परत जाण्यासाठी लागतो. दहावीनंतर शिकण्यासाठी खानापूर किंवा पुण्यात जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे दहावी झालेली बहुतांश मुले-मुली घरीच आहेत, असे शिक्षक व मुलांनी सांगितले. पानशेतमध्ये पाचवी ते दहावी हायस्कूल असताना पुन्हा पहिली ते आठवी नवीन शाळा का बांधली, हे शिक्षक आणि गावकऱ्यांसाठी आश्चर्याचे आहे. त्यापेक्षा वसतीगृह बांधले असते तर अजून जास्त शाळाबाह्य मुले शिकू शकली असती, असे शिक्षकांचे मत आहे.



३. पानशेत शेजारील कुरण गावामध्ये ग्रामसेवक आणि गिवशी-आंबेगावचे सरपंच यांना भेटलो. कमी पटसंख्येची शाळा बंद करण्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी परस्पर निर्णय घेतला असून, गावकरी किंवा ग्रामपंचायतीला विचारले नाही, असे सरपंचांनी सांगितले. गावातली शाळा बंद झाल्यास मुलांचे शिक्षण थांबेल, असे त्यांना वाटते. शालेय वाहतुकीच्या सोयीबद्दल त्यांना खात्री वाटत नाही. मधल्या काळात स्थानिक गावकरी रोजगारासाठी शहरात स्थलांतरित झाले, पण आता गावात हॉटेल, रिसॉर्ट वाढत असल्याने रोजगार उपलब्ध होत आहेत; आता मुलांची संख्यासुद्धा वाढेल, असे त्यांना वाटते. इतर गावांमधील सरपंचांसोबत चर्चा करून शाळाबंदीच्या विरोधात ठराव करण्याची त्यांची तयारी आहे.



४. कुरणच्या पुढे कादवे गावामध्ये पहिली ते चौथी एकूण ८० पटसंख्या आहे. शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव देऊन नवीन वर्गखोल्या बांधण्याचे काम सुरु केले आहे. वरघड, आंबेगाव, गिवशी अशा गावांपासून कादवे गाव पानशेतपेक्षा खूप जवळ आहे. हे गाव ओलांडून पानशेतला क्लस्टर स्कूलपर्यंत मुलांना न्यायची कल्पना कादवेच्या गावकऱ्यांना आश्चर्यकारक वाटली.


५. कादवेपासून आतमध्ये वरघड गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेची पटसंख्या कमी असली तरी इथून पानशेतला जाणे खूप अवघड आहे. गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून तेवढेच शिकलो; सातवीपर्यंत शाळा असती तर अजून शिकलो असतो, असे स्थानिक रहिवाशाने सांगितले. आता ही शाळासुद्धा बंद झाली तर आमची मुले शिकूच शकणार नाहीत, असे त्यांना वाटते.

६. वरघडच्या पुढे आंबेगावमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे, जिथे चौथीची एकच मुलगी शिकते. गावामध्ये या वयोगटातील आणखी मुले नाहीत. पुढच्या वर्षी पहिलीमध्ये दोन मुले येतील, पण ही शाळा बंद झाल्यास इतक्या लहान मुलांना पानशेतला पाठवणे शक्य नाही, असे त्यांच्या पालकांनी सांगितले. सध्या या शाळेतील शिक्षक सदर मुलीला त्यांच्या गाडीतून दररोज दुसऱ्या गावातील शाळेत घेऊन जातात. दुसऱ्या शाळेतदेखील एकच मुलगी शिकते, तिथे या दोन मुलींना एकत्र शिकवले जाते.

७. आंबेगावच्या पुढे गिवशी गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. इथे सध्या एकच विद्यार्थी आहे, परंतु गावामध्ये नवीन घरे बांधली जात आहेत. परिसरातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये कामासाठी स्थानिक किंवा बाहेरील कुटुंबे येत आहेत. मुलांची संख्या वाढेल, असे पोलिस पाटील यांनी सांगितले. गावकऱ्यांशी चर्चा न करता, परस्पर शाळाबंदीचा निर्णय घेऊन खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे, असे पोलिस पाटील म्हणाले. आम्ही ही शाळा बंद होऊ देणार नाही; पूर्वी ज्या गावकऱ्यांनी शाळेसाठी जमीन दिली, त्यांना या जागेवर आता रिसॉर्ट करायचे आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.


वरील सर्व शाळा आज बंद होत्या, कारण सर्व शिक्षक 'प्राथमिक शिक्षक महासंघा'च्या अधिवेशनासाठी रत्नागिरीला गेले आहेत. त्यामुळे शिक्षकांशी बोलता आले नाही. पालक, गावकरी, सरपंच, ग्रामसेवक, या सगळ्यांचा मात्र गावातील शाळा बंद करण्याला आणि क्लस्टर स्कूलमध्ये मुलांना पाठवण्याला विरोध दिसला.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना भेटून पुढील चर्चा व प्रक्रियेचे नियोजन करत आहोत. यासंदर्भात काही सूचना किंवा माहिती असल्यास नक्की कळवा.

धन्यवाद!

मंदार शिंदे
बालहक्क कृती समिती, पुणे

Monday, 6 February 2023

Pune District Child Labour Task Force Meeting 06.02.2023

पुणे जिल्ह्याच्या बाल कामगार विरोधी जिल्हा कृतीदलाची (टास्क फोर्स) मिटींग दि. ०६/०२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे कार्यालयात झाली. कामगार विभागाकडून धोत्रे मॅडम, पुणे पोलिसांकडून कटके मॅडम, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शिर्के मॅडम आणि 'बालहक्क कृती समिती’ (आर्क) कडून मंदार व सुशांत उपस्थित होते. बाल कल्याण समितीला या मिटींगची सूचना देण्याबद्दल मागील तीन महिन्यांपासून फॉलोअप केला; परंतु यावेळी देखील बाल कल्याण समिती सदस्य उपस्थित नव्हते.

मिटींगमध्ये खालील मुद्यांवर चर्चा झाली -

१. जानेवारी महिन्यात 'आर्क'कडून बालमजुरीच्या तीन तक्रारी नोंदवण्यात आल्या. सिंहगड रोड, कोथरुड आणि आळंदी या ठिकाणी धाडसत्र आयोजित केल्याची सूचना मिळाली; परंतु मुले सापडली किंवा नाही याबद्दल रिपोर्ट मिळाला नाही. कदाचित संबंधित मालकांचे अवेअरनेस होऊन त्यांनी मुलांना कामावरून काढले असेल, असे कामगार विभागातर्फे आज सांगण्यात आले. तीनही धाडसत्रांचा रिपोर्ट 'आर्क'च्या ईमेलवर पाठवू, असे त्यांनी सांगितले आहे.

२. नोव्हेंबर २०२१ पासून 'पेन्सिल' पोर्टलवर पुणे जिल्ह्याचा पर्याय दिसत नाही, याबद्दल कामगार विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्रीय कामगार विभागापर्यंत सर्व ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला असून, अजूनही पुणे जिल्ह्यातील तक्रारी पोर्टलवर नोंदवता येत नाहीत. कामगार विभागाच्या धोत्रे मॅडम यांनी याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करून कळवण्यात येईल, असे सांगितले.

३. रस्त्यावर, सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांच्या बाबतीत मागील मिटींगमध्ये चर्चा झाली होती. या मुलांना विक्रीसाठी डस्टबिन बॅग, पेन, प्लास्टीक खेळणी, इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या उत्पादक, वितरक व घाऊक/किरकोळ विक्रेत्यांचा शोध घेण्याबद्दल चर्चा झाली होती. पोलिस व कामगार विभाग यांनी एकत्रित शोध मोहीम राबवल्यास अशा वस्तूंचे स्रोत शोधून, त्यांच्यावर कारवाई किंवा सूचना देता येतील. कामगार विभाग याबाबतीत पाठपुरावा करेल.

४. बालमजुरीची तक्रार मिळाली तरी संबंधित मूल प्रत्यक्ष काम करत असताना फोटो किंवा व्हिडीओ असा पुरावा असल्याशिवाय पोलिस एफआयआर घेत नाहीत, अशी तक्रार कामगार विभागाकडून करण्यात आली. त्यावेळी उपस्थित पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस प्रतिनिधींनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय असावी याबद्दल सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले नसावे. या संदर्भात काही एसओपी असतील तर 'आर्क'ने पोलिस व कामगार विभागाकडे पाठवाव्यात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सुशांत संबंधित डॉक्युमेंट दोन्ही विभागांसोबत शेअर करेल.

टास्क फोर्सची पुढील मिटींग मार्च २०२३ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असे ठरवण्यात आले.

Monday, 23 January 2023

Proposed Cluster School in Panshet Area Pune

नमस्कार!

पुण्यातील पानशेतच्या १० किलोमीटर परिसरातील गावांमधील १६ जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून २५० विद्यार्थी संख्येची एकच 'क्लस्टर स्कूल' बांधली जात आहे.

जानकीदेवी बजाज फाउंडेशन यांच्या देणगीतून इमारतीचे बांधकाम सुरु आहे. फोर्स मोटर्स यांच्यासोबत शालेय वाहतुकीसाठी दोन बसेसचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे.

दोन मजल्यांवर मिळून १२ खोल्या, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, लायब्ररी, आर्ट रूम, एक मोठे खेळाचे मैदान आणि एक मल्टीपर्पज हॉल, अशा सुविधा या 'क्लस्टर स्कूल'मध्ये असतील.

सध्या सुरु असलेल्या १६ शाळांमधील ३७ शिक्षकांऐवजी नवीन 'क्लस्टर स्कूल'मध्ये ११ विषय शिक्षक आणि एक मुख्याध्यापक काम करतील.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील प्रकरण ७ - शाळा संकुल यामध्ये 'कमी पटसंख्येच्या शाळा चालवणे शासनाला आर्थिक आणि व्यवस्थापनदृष्ट्या परवडत नाही' असे विधान केले आहे, ज्याचा आधार घेऊन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणत आहेत की, "जनतेच्या पैशावर नव्हे तर पूर्णपणे सीएसआर फंडातून ही शाळा उभी केली जात असून, आता गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल." (संदर्भासाठी 'हिंदुस्तान टाइम्स'मधील बातमी आणि 'सकाळ सप्तरंग'मधील लेख यांच्या लिंक्स पुढे दिल्या आहेत.)

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ यातील कलम ३ (१) नुसार, ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास आपले प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते आठवी) पूर्ण होईपर्यंत एका ‘शेजार शाळे’मध्ये (नेबरहूड स्कूलमध्ये) मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे. कलम ३ (२) मध्ये आणखी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण मिळवण्यात व तो शैक्षणिक टप्पा पूर्ण करण्यात अडथळा निर्माण करेल अशा प्रकारचे कोणतेही शुल्क (फी) अथवा आकार (चार्जेस) अथवा खर्च (एक्स्पेन्सेस) करावा लागू नये. याच कायद्याच्या कलम ६ नुसार, शासन (राज्य सरकार) व स्थानिक प्रशासन (जिल्हा परिषद, महानगरपालिका, इत्यादी) यांनी अशा ‘शेजार शाळा’ उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. जिथे त्या उपलब्ध नसतील तिथे या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून (अर्थात २०१० सालापासून) तीन वर्षांच्या आत अशा शाळा बांधून द्यायच्या आहेत (होत्या). यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी निधी कशा प्रकारे उपलब्ध करावा याबद्दल कलम ७ (१) ते कलम ७ (५) मध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. एक किलोमीटर अंतरावर इयत्ता पहिली ते चौथी आणि तीन किलोमीटरच्या आत पाचवी ते आठवीपर्यंतच्या शेजार शाळा उपलब्ध केल्या जातील, असे महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय अंमलबजावणीमध्ये जाहीर करण्यात आले होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील प्रकरण ७, मुद्दा क्र. ७.६ नुसार, शक्य असेल तिथे, ५ ते १० किलोमीटर परिसरातील अंगणवाडी ते माध्यमिक शाळांचे एकत्रिकरण करावे, असे सुचवण्यात आले आहे. याचा सोयीस्कर अर्थ असा निघू शकतो की, इतक्या परिसरातील सर्व शाळा बंद करून एकाच आवारात एक मोठी शाळा बांधावी. ही ‘समूह शाळा’ (क्लस्टर स्कूल) संकल्पना असू शकते. प्रत्यक्षात, मुद्दा क्र. ७.४ व ७.५ नुसार, सर्व शाळा आहेत तिथे, आहेत तशाच सुरु राहतील व परस्पर-समन्वय आणि सहकार्यातून साधनांचा सामायिक वापर (रिसोर्स शेअरिंग) करता येईल, असे म्हटले आहे. यामध्ये फक्त सरकारी शाळांचाच विचार केला आहे असे नाही, तर मुद्दा क्र. ७.१० नुसार, खाजगी आणि सरकारी शाळांच्या जोड्या बनवून शक्य तिथे रिसोर्सेस शेअर केले जावेत व शक्य तिथे खाजगी आणि सरकारी शाळांनी एकमेकांकडील ‘बेस्ट प्रॅक्टीसेस’चा उपयोग करून घ्यावा, असेदेखील सुचवले आहे.

अशा प्रकारे छोट्या शाळा बंद करून एकच मोठी शाळा चालवली जाणार असेल तर, ५ ते १० किलोमीटर अंतरावरील गावांमधून रोजची शालेय वाहतूक, प्रवासात आणि दुसऱ्या गावातील शाळेत मुलांची व मुलींची सुरक्षितता, 'क्लस्टर स्कूल'च्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये १६ गावांमधील पालकांचे प्रतिनिधित्व आणि सहभाग, अशा अनेक गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण होतात. गाव/शहर पातळीवरील सध्याच्या शालेय वाहतूक सुविधेची स्थिती अथवा अभाव, संरक्षण आणि प्रतिनिधित्व याबद्दल आपण काम करत असलेल्या शाळांमधील परिस्थिती, याबद्दल आपल्या सर्वांकडे प्रत्यक्ष अनुभव/आकडेवारी उपलब्ध आहेच.

या विषयावर आपले मत किंवा सूचना काय आहेत, यावर कृपया चर्चा करावी.

धन्यवाद!
मंदार, बालहक्क कृती समिती, पुणे


(वर उल्लेख केलेली बातमी व लेख यांच्या लिंक्स -)


Wednesday, 16 November 2022

Children's Art Exhibition in Pune

Exhibition of artworks by children,

organized at Balgandharva Art Gallery

by ARC (Action for the Rights of the Child) Network, Pune











Sunday, 13 November 2022

Child Rights Week Pune 2022


प्रेस नोट

बालहक्क सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


    १४ नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो, तर संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल दिवस म्हणून घोषित केलेला आहे. १४ ते २० नोव्हेंबर बालहक्क सप्ताहानिमित्त पुणे शहरामध्ये बालहक्क कृती समितीतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालहक्कांचे संरक्षण व प्रसार यासाठी गेल्या तीस वर्षांपासून समिती कार्यरत आहे. यावर्षी १८ वर्षांखालील बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दि. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे विविध कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहील. पुण्याच्या विविध भागातील वस्ती पातळीवरील व शाळांमधील मुला-मुलींनी काढलेली चित्रे, तसेच पर्यावरण व प्रदूषण या विषयाशी संबंधित काही छायाचित्रे याठिकाणी पहावयास उपलब्ध असतील. बालहक्कांचा इतिहास व सद्यस्थिती, तसेच बालकांच्या संरक्षण व सहभागासाठी योगदान देण्याच्या विविध संधींबाबत याठिकाणी माहिती मिळू शकेल. तसेच, या कालावधीमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वस्तीपातळीवरील मुलांसाठी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडीया) येथे काही आंतरराष्ट्रीय व प्रसिद्ध चित्रपटांचे विशेष प्रदर्शन (स्क्रिनिंग) आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुला-मुलींना जागतिक स्तरावरील विषय व त्यांची सिनेमाच्या माध्यमातून मांडणी याविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, नागरी सुविधा व समस्यांबाबत युवकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद व इतर संस्था पातळीवरील उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बालमजुरी व बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन, अत्याचार व शोषणापासून बालकांचे संरक्षण, आणि सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, अशी उद्दीष्टे घेऊन बालहक्क कृती समिती काम करत आहे. समितीच्या कामात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क - सुशांत आशा, समन्वयक, बालहक्क कृती समिती, पुणे 7066138138, arcpune09@gmail.com



Press Note

Activities on the occasion of Child Rights Week


    November 14 is celebrated as Children's Day across the country, while the United Nations has declared November 20 as International Children's Day. Action for the Rights of the Child (ARC) Network has organized various activities in Pune city on the occasion of Child Rights Week from 14th to 20th November. The network has been working for the protection and promotion of child rights for the past thirty years. This year, in order to promote the talents of children under 18 years of age, an exhibition of various works of art has been organized at Balgandharva Art Gallery, Jangali Maharaj Road, Pune from 14th to 18th November. The exhibition will be open for all from 10 am to 6 pm. Drawings and paintings made by children from different parts of Pune, and some photographs related to the environment and pollution will be displayed here. The visitors will also find here information about the history and current status of child rights, as well as various opportunities to contribute to the protection and participation of children. Also, during this period, a special screening of some international and famous films has been organized at the National Film Archive of India for children from various communities, in collaboration with various NGOs in Pune. On this occasion, children will get an opportunity to learn about global issues and their presentation through cinema. In addition, interaction of youth with administrative authorities regarding civic amenities and issues and other organization level activities are also being organized. The ARC network is working towards the eradication of harmful practices like child labour and child marriage, ensuring protection of children from abuse and exploitation, and quality education for all. To participate in the activities of the network and for more information, please contact - Sushant Asha, Coordinator, Action for the Rights of the Child (ARC) Network, Pune 7066138138, arcpune09@gmail.com


Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...