प्रेस नोट
बालमजुरी मुक्त भारत
३० एप्रिल २०२३
राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर बालमजुरीच्या समस्येवर काम करण्यासाठी १९९२ साली बालमजुरी विरोधी अभियान (कॅम्पेन अगेन्स्ट चाइल्ड लेबर CACL) या स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. सर्व प्रकारच्या बालमजुरीचे उच्चाटन आणि सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण या मुद्यांवर अभियानाचा विशेष भर आहे. बालमजुरी बाबत जनजागृती, शासनाकडे पाठपुरावा, संशोधन, तसेच बालमजुरीच्या चक्रात अडकलेल्या बालकांची सुटका व पुनर्वसन यासाठी बालमजुरी विरोधी अभियान (CACL) सतत प्रयत्नशील राहिले आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा, खाजगी क्षेत्रातील घटक, शैक्षणिक क्षेत्र, माध्यमे, सामाजिक समूह, नागरिक, आणि बालके, अशा विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे, बाल हक्कांचे उल्लंघन रोखण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपाय योजना करता येतील, असा विश्वास संघटनेला वाटतो. सद्यस्थितीत देशातील अठरा राज्यांमध्ये CACL संघटनेच्या राज्यस्तरीय शाखा अस्तित्वात असून, बालमजुरी निर्मूलनासाठी सक्रियपणे प्रयत्न करीत आहेत.
CACL ची भूमिका व दृष्टीकोन :
- बालकाचे वय: १८ वर्षे
- धोकादायक आणि अ-धोकादायक कामामध्ये कोणताही फरक नाही. बालकांसाठी कोणतेही काम धोकादायकच आहे.
- बालकांनी कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करण्यास विरोध.
- सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण.
- बालमजुरीमागे विविध कारणे असतात, केवळ गरिबी, असहाय्यता हे कारण नाही - कायद्यातील त्रुटी, स्वस्त मजुरी, सामाजिक विषमता, वगैरे कारणे देखील आहेत.
बालमजुरीमुळे बालकांना अकाली प्रौढांसारखे आयुष्य जगावे लागते, वेतनासाठी किंवा विना-मोबदला अशा परिस्थितीमध्ये काम करावे लागते ज्यामुळे त्यांच्या शारीरिक, सामाजिक, भावनिक, आणि आत्मिक विकासाला खीळ बसते, तसेच शिक्षण, आरोग्य, आणि विकासाचे मूलभूत हक्क नाकारले जातात. प्रत्येक शाळाबाह्य मूल हे संभाव्य बालकामगार असते, अशी CACL ची समजूत असून, औपचारिक अथवा अनौपचारिक, संघटित अथवा असंघटित, कौटुंबिक अथवा कुटुंबाबाहेरील, अशा कोणत्याही क्षेत्रातील, व्यवसायातील, अथवा प्रक्रियेतील कोणत्याही स्वरूपाच्या बालमजुरीला संघटनेचा विरोध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची बालहक्कांवरील सनद (UNCRC) आणि राष्ट्रीय बाल धोरण २०१३ यांच्याशी सुसंगत भूमिका घेत, १८ वर्षे वयापर्यंतच्या कोणत्याही स्वरूपाच्या बालमजुरीचे संपूर्ण उच्चाटन व्हावे यासाठी CACL पाठपुरावा करीत आहे.
#बालमजुरीमुक्तभारत - ४४ दिवसीय अभियान
३० एप्रिल (राष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिवस) रोजी CACL च्या सर्व १८ सदस्य राज्यांमध्ये एका ४४ दिवसीय अभियानाची सुरुवात केली जात आहे. १२ जून (जागतिक बालमजुरी विरोधी दिवस) रोजी या ४४ दिवसीय अभियानाची सांगता होईल असे प्रस्तावित आहे.
३० एप्रिल: ४४ दिवसीय अभियानाची सुरुवात –
राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे आणि राज्य तसेच जिल्हा पातळीवर खालील उपक्रमांद्वारे अभियानाची सुरुवात करण्यात येईल :
- पत्रकार परिषद
- डिजिटल पोस्टरचे प्रकाशन
- बालमजुरी व्यवस्थेसंबंधी विधेयकाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे प्रकाशन (भारताला बालमजुरी मुक्त करण्यासाठी CACL द्वारे प्रस्तावित केलेले विधेयक).
सोशल मीडियाद्वारे जनजागृती
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील प्रत्यक्ष उपक्रमांसोबत सोशल मीडियावर देखील समांतर अभियान राबवले जाईल, ज्यामध्ये बालमजुरीमागील विविध कारणांवर प्रकाश टाकणे, बालमजुरीच्या विळख्यात अडकलेल्या बालकांच्या मोठ्या संख्येला उजेडात आणणे, समाजामधील प्रस्थापित गैरसमजांचे निराकरण करणे, आणि ऑनलाईन उपक्रमांद्वारे लोकांच्या सहभागातून जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.
या अभियानादरम्यान, प्रत्येक आठवड्यात बालमजुरी निर्मूलनासाठी महत्त्वाच्या एका घटकावर आधारित विशेष उपक्रम राबविले जातील.
१. मूल म्हणजे कोण?
२. प्रत्येक शाळाबाह्य मूल हे बालमजूर असते.
३. अठरा वर्षे वयाखालील बालकांनी काम का करू नये?
४. बालमजुरीचे अप्रत्यक्ष आणि छुपे प्रकार.
५. बालमजुरीची तक्रार कशी नोंदवावी?
६. 'बालमजुरीमुक्त भारता'चे उद्दिष्ट कसे साध्य होईल?
१२ जून: ४४ दिवसीय अभियानाची सांगता –
१२ जून २०२३ रोजी एका राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून ४४ दिवशीय अभियानाची सांगता होईल.
No comments:
Post a Comment